मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाल्यासंबंधी केलेल्या विधानाचा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. काँग्रेस नेत्याचे विधान देशभक्ती नव्हे तर देशद्रोह आहे. त्यांच्या विधानाच्या पाकिस्तानात हेडलाईन्स झाल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगामच्या हल्ल्यात आपल्या लाडक्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचे पाप केले. त्याचा संपूर्ण जगाने निषेध केला. त्यानंतर आपल्या लष्करी जवानांनी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी लष्कराला ‘खून का बदला खून से’ घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर झालेल्या कारवाईत लष्कराने आपल्या लोकांवर कोणताही हल्ला होऊ दिला नाही. त्यांनी पाकिस्तानातील अतिरेकी अड्डे उद्धध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला एक जबरदस्त उत्तर दिले.
ते म्हणाले, लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचे विधान काँग्रेसकडून होणे ही अत्यंत चिंताजनक व दुर्दैवी बाब आहे. देशविघातक बाब आहे. हे देशप्रेम नव्हे तर पाकिस्तान प्रेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी केलेल्या विधानाच्या पाकिस्तानात हेडलाईन्स झाल्या. त्यामुळे पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्तानची जनता माफ करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही लष्कराच्या पाकवरील कारवाईचा हिशोब विचारला होता. किती ड्रोन पडले, किती विमाने पडली, किती तासांत युद्ध थांबले? त्यांनी लष्कराच्या मागे उभे राहण्याची गरज होती.



