नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे क्रीडामंत्री तथा निफाडचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून, अखेर त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायमूर्ती रुपाली नरवडीया यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या आदेशामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात हस्तक्षेप याचिकाकर्त्या ॲड. अंजली दिघोळे-राठोड यांनी कोकाटे यांच्या अटकेसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी घेत न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
१९९५ साली मुख्यमंत्री कोट्यातून मिळणाऱ्या घरांच्या योजनेत गैरप्रकार करत माणिकराव कोकाटे व त्यांच्या भावांनी एकूण चार सदनिका लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी कोकाटे बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांचा कारावास व प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. मात्र शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आता अटक वॉरंट जारी झाल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदासह आमदारकीवरही टांगती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दोषसिद्धी कायम राहिल्यास लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या प्रकरणात शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावर उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई रंगण्याची शक्यता असून, या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



