जळगाव : विजय पाटील
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून बहुपक्षीय लढतीची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. २०१८ च्या निवडणुकीत भाजपने चारही जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र आता भाजपसमोर गड राखण्याचे मोठे आव्हान उभे आहे. शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांकडून उमेदवार उभे राहणार असल्याने प्रभागात चुरशीची लढत रंगणार आहे. पक्षाकडून उमेदवार निश्चित झाल्यावर प्रचाराची व विजयाची रणनीती आखण्याची तयारीला आता सुरुवात झाली.
या प्रभागावर पूर्वी सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व व दबदबा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथे भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना या पक्षाने येथे वर्चस्व निर्माण केलेले आहे. त्यात आता सुरेश दादा हे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांना चांगलाच जोर लावावा लागणार आहे.२०१८ मध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र आता शिंदे गट, ठाकरे गट, एमआयएम व राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांच्या उमेदवारांमुळे प्रभाग दोनमध्ये बहुपक्षीय लढत रंगणार आहे. जातीय समीकरणे, आरक्षणाचा प्रभाव, तसेच स्थानिक नेत्यांचे निर्णय यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग दोन हा संपूर्ण महापालिकेतील सर्वाधिक रंगतदार व चर्चेचा प्रभाग ठरणार आहे.
भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुक उमेदवार अधिक
जळगाव महापालिकेच्या २०१८ च्या निवडणुकी मध्ये विजयी ठरलेले भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे व किशोर बाविस्कर हे शिंदे गटात गेले. त्यामुळे भाजपसमोर कांचन सोनवणे व गायत्री शिंदे यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर महायुतीत समन्वय झाला तर भाजप दोन व शिंदे गट दोन जागांवर लढेल. अन्यथा भाजपकडून युवा मोर्चातील पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे महेश चौधरी, तसेच भरत कारडीले यांसारख्या इच्छुकांना संधी मिळू शकते. शिवसेना ठाकरे गटाकडून विजय बांदल यांच्यासह तरुण व निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. प्रभागातील आरक्षण सोडतीनुसार ओबीसी व सर्वसाधारण महिलांसाठी जागा राखीव झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नवनाथ दारकुंडे यांच्या पत्नी जोत्सना दारकुंडे किंवा मुलगी पायल दारकुंडे उमेदवारीस येऊ शकतात. तर किशोर बाविस्कर यांच्या पत्नी उज्वला बाविस्कर एसटी गटातून उमेदवार असू शकतात.
जातीय समीकरण ठरणार महत्त्वाचे
या प्रभागात मराठा समाजाचे ८ हजार, कोळी समाजाचे ३,८००, मुस्लीम समाजाचे ३,२००, तेली समाज तिसऱ्या क्रमांकावर असून कुंभार, गवळी, शिंपी यांसह इतर समाजाचे मतदारही निर्णायक ठरणार आहेत. जातीय समीकरण लक्षात घेऊन मराठा व कोळी समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याची शक्यता स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
बहुपक्षीय आव्हान
भाजप व शिंदे गटातील अंतर्गत स्पर्धा तर आहेच, पण शिवसेना ठाकरे गटाने तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय एमआयएम पक्षाकडून मुस्लीम समाजातील प्रभावी उमेदवार उभे राहण्याची शक्यता असून त्यांचा मतदारांवर लक्षणीय प्रभाव पडू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील प्रभागात उमेदवार देऊन भाजप व महायुतीला कडवे आव्हान देणार आहे.



