मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत सक्रिय सहभाग घेत होते. मात्र शनिवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात आले. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच्या कामकाजात त्यांना सहभागी होता आले नाही.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन उदय सामंत यांची आस्थेवाईकपणे भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून उपचारांचा आढावा घेतला तसेच सामंत यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “उदय सामंत हे अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष मंत्री आहेत. त्यांच्या तब्येतीत होत असलेली सुधारणा ही दिलासादायक बाब आहे. ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व तपासण्या समाधानकारक असून बुधवारी (उद्या) उदय सामंत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी राज्यभरातून तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून शुभेच्छा आणि प्रार्थनांचा वर्षाव होत आहे.



