मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील शंकर मंदिर परिसरात असलेले हे कार्यालय नेहमीच नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांच्या वर्दळीचे केंद्र मानले जाते. त्यामुळे भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात इसम अचानक कार्यालयासमोर थांबले आणि क्षणाचाही विलंब न करता कार्यालयाच्या दिशेने ३ ते ४ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आला असता, हल्लेखोरांनी त्यालाही लक्ष्य करून गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य कार्यालयाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून, त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकीचा मार्ग तपासला जात आहे.
दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या काळात उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ पोलिस ठाण्यात दाखल झाले. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गोळीबार करणाऱ्या संशयितांची नावे माहिती देऊनही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नरेंद्र पवार यांच्यासह गुलाबराव करंजुळे आणि अनेक भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीच्या तोंडावर तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत, आरोपी मोकाट राहिल्यास नागरिक व उमेदवारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. दरम्यान, पोलिस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



