चंद्रपूर : वृत्तसंस्था
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला सावकाराने चक्क स्वतःची किडनी विकण्यास भाग पाडल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांच्यावर हा अमानुष प्रकार घडला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात गेल्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज घेतले. मात्र, दुर्दैवाने खरेदी केलेल्या दुधाळ गायी मरण पावल्याने कर्जाचा डोंगर वाढतच गेला.
कर्ज फेडण्यासाठी कुडे यांनी दोन एकर शेती, ट्रॅक्टर तसेच घरातील मौल्यवान साहित्य विकले. तरीही कर्ज संपले नाही. उलट व्याजासह कर्जाची रक्कम एक लाख ७४ हजार रुपयांवर पोहोचली. सावकारांकडून सातत्याने पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. अखेर एका सावकाराने कर्जातून मुक्त होण्यासाठी किडनी विकण्याचा सल्ला दिला.
एका एजंटमार्फत रोशन कुडे यांना कोलकाता येथे नेण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी आठ लाख रुपयांना विकण्यात आली. मात्र, एवढे करूनही त्यांचे संपूर्ण कर्ज फिटले नाही. या गंभीर प्रकरणाबाबत कुडे यांनी याआधीच पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते, तर हा दुर्दैवी प्रकार टाळता आला असता, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
कर्जासाठी स्वतःची किडनी गमावूनही हातात काहीच उरले नसल्याने रोशन कुडे यांनी थेट मंत्रालयात संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे प्रशासनाची संवेदनशीलता, सावकारांचा अमानुषपणा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.



