जळगाव : प्रतिनिधी
नवीन वीजमिटर बसविण्यासाठी अगोदर चार हजार दिले. परंतू वीजमिटर न बसल्याने चौकशीसाठी गेलेल्या डॉक्टरकडून दोन हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे डॉक्टर असून त्यांचा मुलाच्या नावे वीजमिटर घेण्याकरीता वायरमन लोंढे यांना भेटले. त्यांनी वीजमिटरसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची चौकशी केली असता, लोंढे यांनी चार हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार डॉक्टर यांनी चार हजार रुपये देखील दिले. परंतू आत्मारमा लोंढे यांनी वीजमिटरचे काम केले नव्हते. दरम्यान, तक्रारदार यांनी लोंढे यांच्याकडे वीजमिटरबाबत विचारणा केली असता, त्यांनी आणखी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी दि. १५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला असता, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे यांना पंचासमक्ष दोन हजारांची लाच घेतांना पथकाने रंगेहाथ पकडले. लोंढे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



