नागपूर : प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नागपूर महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. “माझ्या राजकीय आयुष्यात चांगले रस्ते मोठ्या प्रमाणात झाले आहेत. आता किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, किती जणांना सस्पेंड करतो, याचा रेकॉर्ड माझ्या नावावर व्हावा, यासाठी मी देशभर हात धुवून मागे लागलो आहे,” असा थेट इशारा गडकरी यांनी दिला.
जनतेला चुकीसाठी शिक्षा होते, मात्र नियमानुसार वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे काय करायचे? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर बोट ठेवले. विकासकामांमध्ये दिरंगाई, निष्काळजीपणा आणि नियमभंग सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना गडकरी यांनी नागपूर महापालिका आयुक्तांनाही चिमटा काढला. “आपण जनतेशी प्रामाणिक राहिले पाहिजे. गोड बोलतात म्हणून कोणाचे ऐकायचे काही कारण नाही. जनता हीच खरी मालक आहे, तिची कामे झालीच पाहिजेत. जी व्यवस्था न्याय देत नाही, ती उखडून टाकली पाहिजे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
“मी काम केले नाही तर मला मुर्दाबाद करण्याचा अधिकार जनतेला आहे,” असे परखड वक्तव्य करत गडकरी यांनी लोकशाहीतील जबाबदारीची जाणीव करून दिली. पुढे बोलताना त्यांनी नागपूर मनपा आयुक्तांबाबत गंमतीशीर टोला लगावत म्हटले की, “नागपूर मनपा आयुक्तांना पुढील लोकसभा निवडणूक माझ्याविरोधात लढायची आहे, कारण इतके सहहृदयी आयुक्त इथे याआधी आले नाहीत. नेते अतिक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि अधिकारी काढण्याचा; मात्र इथे चित्र उलटे आहे,” असा टोला गडकरी यांनी लगावला.
गडकरी यांच्या या स्पष्ट आणि कडक भूमिकेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांच्या वक्तव्याची राजकीय व प्रशासकीय स्तरावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



