जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडे दरम्यान शनिवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास भुसावळहून जामनेरकडे येणाऱ्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिली. यात आई आणि महिन्यावर लग्न असलेली लेक यांच्यासह ३ जण ठार, तर पाचजण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (वय ४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा. चिंचखेडे बुद्रुक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये जयेश निंबाळकर (वय १६), योगेश गायकवाड (४५, रिक्षाचालक, रा. विवेकानंद नगर, जामनेर), सुरेखा विलास कापडे (५०) संगीता सुभाष चौधरी (५०, दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर), अखिलेश कुमार (५०, रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. धडक बसताच रिक्षा पूर्णपणे गोल फिरून रस्त्याच्या बाजूला उलटली. उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर डॉ. प्रशांत महाजन, डॉ. हर्षल चांदा, डॉ. नरेश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना जळगावला हलविण्यात आले. चिंचखेडे बुद्रुक व तळेगाव येथील मयतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली.


