चाळीसगाव : प्रतिनिधी
लग्न केल्याचे नाटक करून लग्नाच्या बदल्यात अडीच लाख रुपये उकळून तोतया नवरीने अंगावरील दागिन्यांसह लग्नानंतर चौथ्या दिवशी पळ काढल्याचा प्रकार वाघळी येथे घडला आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या नवरीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वाघळी येथील ३० वर्षीय तरुणाच्या विवाहासाठी त्याचे कुटुंबीय मुलीच्या शोधात होते. वाघळीतील एका महिलेशी फसवणूक झालेल्या तरुणाच्या कुटुंबाची ओळख झाली. महिलेने एक गरीब कुटुंबातील मुलगी शोधून देते; पण त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, असे सांगितले. तरुणाच्या कुटुंबाने पैसे देण्यास होकार दर्शविल्यानंतर त्या महिलेने तुमच्यासाठी अकोला येथे मुलगी बघितली आहे, तिच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे, असे सांगून अडीच लाखांची मागणी कली.
तरुणासह त्याचे कुटुंबीय ४ जून २०२५ रोजी मुलगी पाहण्यासाठी आरती गोपाल (चौपाडे हरीपेठ, अकोला) येथे घरी गेले. सर्वांना आरती पसंत पडली. त्यानंतर विवाहाची बोलणीही करण्यात आली. वाघळीचा तरुण व अकोला येथील आरती चौपाडे यांचे वाघळी येथे कमळेश्वर मंदिरात लग्न लागले. मुलाच्या कुटुंबाने लग्न जुळवून देणाऱ्या महिलेला अडीच लाख रुपये दिले. लग्नानंतर तीन-चार दिवस आरती ही वाघळी येथे राहिली. चौथ्या दिवशी तिने आपल्या बहिणीची प्रकृती खराब झाल्याची थाप मारत माहेरी जायचे असल्याचे सांगितले.
तिला घेऊन नवरदेव मुलगा अकोला येथे आला. तेथून आरतीने त्याची नजर चुकवत धूम ठोकली. आरती दिसत नाही, म्हणून तरुणाने तिच्या बहिणीला विचारले असता ती कोठेतरी गेली आहे, तुम्ही तुमच्या गावी जा, असे सांगितल्यावर तरुण गावी परतला. बरेच दिवस होऊनही ती न आल्याने तरुणाचे कुटुंबीय अकोला येथे आरतीचा शोध घेण्यासाठी गेले असता तुम्ही आरतीला शोधण्यास आला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तरुणाच्या फिर्यादीवरून आरती गोपाल चौपडे उर्फ आरती रवींद्र माळी (हरी पेठ, अकोला), सुनंदाबाई विश्वनाथ गायकवाड (रांजणगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर), मनीषा मानधनी (हरी पेठ, अकोला), वर्षा नादापुरे (परभणी), राजू विश्वनाथ गायकवाड (रांजणगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


