जळगाव : प्रतिनिधी
राज्य सरकारकडून ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वीच केली असतानाही, नशिराबाद येथील शेतकऱ्यांवर युनियन बँकेकडून सक्तीची कर्जवसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या गैरप्रकाराविरोधात माजी सरपंच पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टी, नापिकी, जमीनधूप आणि पिकांचे प्रचंड नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जफेड अशक्य झालेल्या या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. तसेच, कर्जमाफी लागू होईपर्यंत कोणत्याही बँकेने वसुलीची सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना देखील दिल्या आहेत.
तथापि, नशिराबादमधील युनियन बँक अधिकारी शेतकऱ्यांना फोन करून व घरी जाऊन धमकावणाऱ्या पद्धतीने कर्जफेडीची मागणी करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. “कर्जमाफी झाल्यावर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळणार नाही” अशा धमक्या देऊन अनेक शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक गर्तेत अडकलेले असताना बँक अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत : युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेली अनधिकृत कर्जवसुली तात्काळ थांबवावी. शेतकऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनिक चौकशी करून कठोर कारवाई करावी. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना पात्र शेतकऱ्यांना मिळावा. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व बँकांना स्पष्ट सूचना जारी कराव्यात. शेतकरी दोन आघाड्यांवर – नैसर्गिक संकट आणि बँकांच्या दबावामुळे – त्रस्त झालेले असताना शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी पुष्कराज सुरेश रोटे, किरण रामा वाघुळदे, चंद्रकांत रघुनाथ पाटील, देवेंद्र हेमराज पाटील, संदीप विष्णू पाटील, केवल घनश्याम पाटील, दिगंबर जीवराम रोटे, निलेश सुरेश रोटे, चंद्रकांत तळेले, विनायक चौधरी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.



