नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना सुळे यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘पैसा, दडपशाही आणि घराणेशाही’ यांचा वाढता प्रभाव तीव्र शब्दांत मांडला. “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकशाहीने उभे राहण्याची मुभा आहे, पण महाराष्ट्रातील भाजपच्या मंत्र्यांच्या पत्नी-आई यांच्या विरोधात उमेदवारी अर्जही भरू दिला जात नाही,” अशी संतप्त टीका त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील अनियमिततेकडे लक्ष वेधताना सुळे म्हणाल्या, “निवडणुकांमध्ये प्रामाणिकता आणि पारदर्शकता अत्यावश्यक आहे. मात्र महाराष्ट्रात २० ठिकाणी निवडणुका झाल्याच नाहीत आणि सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे उमेदवार सत्ताधारी भाजपशी संबंधित असून त्यातील अनेक जण मंत्रीमंडळातील सदस्यांच्या पत्नी, आई, बहिणी किंवा भावजई आहेत. एक-दोन जागा बिनविरोध असणे समजू शकते, पण २५ जागा कशा काय बिनविरोध? लोकशाहीत विरोधक अस्तित्वात असणे हीच बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे.”
सुळे यांनी सिंधुदुर्गातील चर्चेत असलेल्या नोटाबंडल प्रकरणाचाही संसदेत उल्लेख केला. “भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात नोटांनी भरलेल्या थैल्या आढळल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्रकार तिथल्या शिवसेना नेते नीलेश राणे यांनीच उघड केला होता. मग एवढा पैसा आला कुठून?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी म्हटले की, “निवडणूक आयोगाच्या कामकाजात पक्षीय हस्तक्षेप नसावा. निवडणूक व्यवस्था घटनात्मक अधिकारांवर आधारित असायला हवी. गेल्या ७० वर्षांत सर्वच सरकारांनी काहीतरी चांगले केले आहे. आम्ही येथे केवळ टीका करण्यासाठी आलो नाही. निवडणूक सुधारणांसाठी एकत्र चर्चा व्हावी आणि पुढील पिढीला अधिक सक्षम लोकशाही द्यावी ही आमची अपेक्षा आहे.”
घराणेशाहीवरील टीकेला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, “मी घराणेशाहीतूनच आले आहे आणि त्याचा मला लाज नाही. कारण आम्ही थेट जनतेकडून निवडून येतो, कुठेही कॉपी करून पास होत नाही. आज मात्र भाजपमधील घराणेशाही सर्वाधिक वाढलेली दिसते.” भाजपवर थेट निशाणा साधत त्यांनी म्हटले, “महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी उमेदवारांना फॉर्म भरू दिला नाही. दडपशाही, हिंसाचार, धमक्या… हे सर्व लोकशाहीला शोभणारे नाही. आम्हाला न्याय मिळावा आणि पारदर्शक निवडणूक व्हावी, एवढीच अपेक्षा आहे.” सुळे यांच्या या वक्तव्यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली असून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



