नोकर भरती संस्थाचालकांच्या अंगलट येणार ?
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उघडकीस आलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले आहे. प्रारंभी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर आता चौकशीचा फेरा संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांपर्यंत पोहोचला आहे. अमळनेर शहरातील अनेक शाळांमध्ये संशयास्पद भरती झाल्याचे संकेत मिळाल्याने विशेष तपास पथक (एसआयटी) कारवाईस सज्ज झाले आहे.
तत्कालीन शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुरू झालेल्या चौकशीने आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्यापर्यंत मजल मारली आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण बोगस आयडीच्या माध्यमातून झालेल्या नियुक्त्यांवर चौकशी होणार असल्याने संबंधित शिक्षकांमध्ये नोकरी गमावण्याची भीती वाढली आहे. लाखो रुपयांची देवाणघेवाण करून कामे करून घेतलेल्या शिक्षकांना आता रक्कम परत करण्याचे आदेश निघाले तर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शालेय विभागाच्या परवानगीनंतर आर्थिक गुन्हे शाखेला अद्ययावत माहिती देण्यात येणार असून, काही तत्कालीन अधिकाऱ्यांनी अधिकाराबाहेर जाऊन केलेल्या भरतीचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे अनेक संस्थाचालक व पदाधिकारी धास्तावले आहेत.
एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कुलमधील बोगस पदभरतीची कागदपत्रे एसआयटीकडे सुपूर्द करण्यात आली असून लवकरच तपासणी होणार आहे. त्याचबरोबर अमळनेर तालुक्यातील इतर शाळांवरही चौकशीचा फेरा वाढणार असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींमुळे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, संस्थाचालक आणि शिक्षकांमध्ये धाकधूक व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक संस्थेतील भरतीचे कारनामे लवकरच लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वर



