नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सुपूर्द करण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध करत आदित्य यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणालेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा व विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी सरकारवर हे पद हेतुपुरस्सर रिक्त ठेवण्याचा आरोप केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाही, तर विधिमंडळाचे अध्यक्ष व सभापतींकडे असल्याचे सांगत हा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचे नाव पुढे केले आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
पण आज अचानक राजकीय वर्तुळात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे भास्कर जाधव दुखावले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी आदित्य यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. ते याविषयी बोलताना म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवणे हे 2019 च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिंमडळाच्या रचनेसारखे झाले. सरकार बनवताना उद्धव ठाकरे यांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितले की, मला तुमच्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री करायचाय.
त्यानंतर मुख्यमंत्रीचा मुद्दा आला तेव्हा त्यांनी स्वतःचे नाव सुचवले. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही तर त्यांनी स्वतःच्या मुलालाही कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे येत असेल तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला, तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणाले. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मला विरोधी पक्षनेतेपद देण्याची बातमी पेरलेली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणालेत.



