अमळनेर : प्रतिनिधी
जळोद रस्त्यावर आर्मी स्कूलजवळ २४ नोव्हेंबरला दुपारी जावयाने सासूच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून तिला मारहाण केल्याची घटना घडली. उपचार घेतल्यानंतर पीडित महिलेने फिर्याद दिली असून जावयाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबापिंप्री (ता. पारोळा) येथील मीनाबाई समाधान कोळी असे सासूचे तर विनोद विक्रम कोळी (रा. खंबाळे, ता. शिरपूर) असे जावयाचे नाव आहे. पत्नीने तीन वर्षापूर्वी आत्महत्या केली आणि दुसरे लग्न केले असले तरीही विनोद हा पहिल्याच सासुरवाडीत राहत होता.
मीनाबाईचा मुलगा भरत आणि जावई विनोद कोळी यांच्यात वाद झाला. तो मिटविण्यासाठी २४ नोव्हेंबरला विनोदने फोन करून मीनाबाईला अमळनेर शहरात पैलाड येथे बोलावले. ती आल्यावर त्याने तिला जळोद रस्त्यावरील आर्मी स्कूलच्या पुढील खदानीजवळ मारहाण केली आणि तिने घातलेले दागिने हिसकावले. मीनाबाईचे एकूण ५० हजार रुपये किमतीचे दागिने विनोदने ओरबाडून नेले. मारहाणीमुळे मीनाबाई बेशुद्ध पडली नंतर प्रवाशांच्या मदतीने ती अमळनेर येथे आली. दवाखान्यात उपचारानंतर मीनाबाईने अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विनोद कोळी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.


