जळगाव : प्रतिनिधी
नाशिकच्या एका व्यक्तीने स्वतः एका कंपनीच्या कॅन्टीनचा ठेकेदार असल्याचे सांगून जळगावातील एका व्यापाऱ्याची १ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची ४ डिसेंबर रोजी घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मालाचे पैसे न देता व्यापाऱ्याला धमकाविल्याचाही आरोप आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दाणाबाजार भागातील ५१ वर्षीय व्यापारी यांना २ जून रोजी सारंग देशपांडे (रा. नाशिक, पूर्ण नाव-पत्ता माहित नाही) नावाच्या व्यक्तीने फिर्यादी व्यापाऱ्याला फोन केला. आपण एका कंपनीत कॅन्टीन चालवत असल्याचे खोटे सांगून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्या नंतर सारंगने त्याच दिवशी परस्पर ठरवलेले ट्रान्सपोर्टचे वाहन चालकासह फिर्यादीच्या दाणा बाजार येथील दुकानावर पाठवले. या वाहनातून आरोपीने गहू, तांदूळ, तूर दाळ आणि मूग दाळ असा एकूण १ लाख १७ हजार रुपये किमतीचा माल नेला. वारंवार पैसे मागितल्यानंतरही त्याने टाळाटाळ केली व फिर्यादीला धमकी दिली. या फसवणुकीप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात सारंग देशपांडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे



