रावेर : प्रतिनिधी
वाघोड फाटा रस्त्यावर पायी जात असलेल्या महिलेजवळ दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी खिरवड रस्ता विचारण्याचा बहाणा करून तिच्या डोळ्यात माती फेकली आणि गळ्यातील सोन्याची पोत जबरीने ओरबाडली होती. दोन्ही आरोपींना अंतुर्ली शिवारात सापळा रचून पोलिसांनी पकडले. रावेर न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोड गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यावर संशयित आरोपींच्या रावेर शहरातील रेकी मोहिमेची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील शेती शिवारात सापळा रचला. अंतुर्ली शिवारात झडप घालून आरोपी मोटारसायकलवर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रावेर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा पाठलाग करून त्यांची मुसक्या आवळल्या. अजय गजानन बेलदार (वय २०) व नरेंद्र उर्फ नीलेश अशोक बेलदार (वय २०), दोघेही अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी कबुली दिली आहे, तसेच ३ नोव्हेंबर रोजी कुन्हा काकोडा बसथांब्याजवळ एका महिलेचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा पोत ओरबाडल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींकडून ७५ हजारांची मोटारसायकल आणि १ लाख ७५ हजार रुपयांचे १३ ग्रॅम वजनाचे सोने असा तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सायबर क्राइम पोलिस कॉ. मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी तपासासाठी मदत केली. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार तुषार पाटील करीत आहेत



