नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकालाबाबत महत्वाचा निर्णय सर्वेाच्च न्यायालात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीत कायम ठेवला आहे. त्यामुळे २ डिसेंबर रोजी झालेल्या आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबरलाच जाहीर करण्यात येणार आहे.
या निवडणुकांच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वेाच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. याबाबत आज सुप्रीम कोर्टात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरपूर्वीच लावण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.
त्यावर आज कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली असून, नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. या सुनावणीत कोर्टाने कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ आधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच हायकोर्टातील याचिकांमुळे निवडणूक कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होता कामा नये, असे देखील कोर्टाने स्पष्ट केले आहे.



