जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता रावेर पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने सोनसाखळी जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत दोन सराईत चोरांना अटक केली आहे. संशयितांच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी आहेत.
रावेर येथे दाखल गुन्हा क्रमांक ४७४/२०२५ (कलम ३०४(२)) मध्ये शोभाबाई सुरेश पाटील या एक नोव्हेंबर रोजी दुपारी वाघोडकडे जात असताना दोघा अज्ञात व्यक्तींनी माती फेकून त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावून नेली होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासूनही आरोपींचे चेहरे स्पष्ट न दिसल्याने तपास अडथळा येत होता. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रेकी करून वाघोडकडे जात असल्याचे दिसून आले. वाहनाचा आणि शरीरयष्टीचा मिळालेला सुगावा पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला.
तांत्रिक तपासावरून आरोपींची ओळख पटवून पथकाने अंतुर्ली येथे पोहोचून शोध मोहीम सुरू केली. आरोपी गावातून फरार झाले असले तरी पोलिसांनी तळ ठोकून शोध सुरू ठेवला. नंतर आरोपी गावात परतल्याची माहिती मिळताच पथकाने पाठलाग करून अजय गजानन बेलदार (वय २०) आणि नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार (वय २०) यांना पकडले. पोलीस चौकशीत दोघांनी तीन नोव्हेंबर रोजी कुऱ्हा-काकोडा बसथांब्यावर एका महिलेची सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३६/२०२५ नोंद करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालात विनानंबर प्लेटची बजाज पल्सर दुचाकी (किंमत अंदाजे ७५ हजार) आणि १३.३०४ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे १ लाख ७५ हजार) आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील व गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच सायबर पोलिसांचे मिलींद जाधव व गौरव पाटील यांनी तपासात सहकार्य केले.


