मुंबई : वृत्तसंस्था
माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कुठलेही वाद नाहीत. आपल्या घरातही दोन भावांची मते ही काही प्रमाणात वेगवेगळी असतात. प्रखरतेने दोन्ही भाऊ आपापली मते मांडत असतात. सगळ्याच गोष्टींमध्ये आमचे एकमत झाले असते, तर आम्ही एकाच पक्षात असतो, तर मग आम्ही वेगवेगळ्या पक्षात का आहोत? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या निवडणूकांच्या प्रचारा दरम्यान दोन्ही नेत्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे देखील मतभेदांच्या चर्चांना खतपाणी मिळाले. एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मुंबईत असताना, माध्यमांनी थेट शिंदेंसोबत मतभेद आहेत का? अशी विचारणा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर सविस्तर उत्तर देताना, आपली भूमिका स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले की, व्यापक दृष्टीकोनातून पाहिल्यास आम्ही एकत्रच आहोत, आणि एकत्रच राहणार देखील आहोत. एखाद्या निवडणुकीमध्ये काही गोष्टी घडल्या, याचा अर्थ लगेच मतभेद झाले असा होत नाही. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या असतात. निवडणूका आल्या की आम्ही काही गोष्टी त्यांच्यावर लादू असा त्याचा अर्थ होत नाही.
भाजपला मित्रपक्षांची आवश्यकता उरली नाही, शत प्रतिशत भाजप हे चित्र दिसत असले तरी युती का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, आमचे जे मित्र आहेत, त्यांना आपल्या बरोबरच ठेवायचे असल्याचा आमचा निर्णय आहे.
भाजपची ताकद वाढली असली तरी देखील आम्हाला मित्रांची गरज आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. 2029 च्या विधानसभा निवडणूका देखील आम्ही युती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे आमची ताकद वाढणार असली, तरी मित्रपक्षांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.


