जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश सोमवार, 1 डिसेंबर रोजी रात्री 10.05 वाजेपासून मंगळवार, 3 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहेत.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (2) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. निवडणूक 2025 च्या मतदान व मतमोजणी दरम्यान कोणताही गोंधळ, अव्यवस्था किंवा गुन्हेगारी कृती होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत.
आदेशानुसार मतदान केंद्र परिसरात पाचपेक्षा अधिक लोकांचा अनधिकृत जमाव, मोर्चा, प्रचार, ग्रुपमध्ये वावरणे यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना या बंदीपासून सूट देण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. कोणतीही गैरप्रकार, अफवा पसरवणे किंवा अपप्रचारात्मक कृत्य टाळण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.


