मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील २२६ नगर परिषदा आणि ३८ नगर पंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली असून सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा नगरपरिषदेसाठी मतदान सुरू आहे. या दरम्यान नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला. तर मालवण नगरपरिषद निवडणुकीत लग्न सोहळा असताना वधूने मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले. मालवण भंडारी स्कूल येथे दोन वधूंनी मतदान केले.
निवडणुकीत एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपालिका व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होईल.
दरम्यान, राज्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबरला घोषित केल्या होत्या. त्यानुसार, २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. परंतु, काही उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेले अपील प्रलंबित असल्याने एकूण २० नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तर ७६ नगर परिषदा, नगर पंचायतींमधील १५४ सदस्यपदांसाठी निवडणूक स्थगित झाली आहे.
मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी असेल. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये परंतु मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाइल जमा करण्यासाठी शक्य तिथे कक्ष असेल. सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असून निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला बुधवारी होणार आहे.
तब्बल आठ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे कोणाच्या बाजूने मतदार कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



