अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमीयुगुलाने झाडाला एकाच दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी देवगाव-देवळी (ता. अमळनेर) येथे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दिनेश बद्री पावरा (२२, रा. हिंगोणे जळोद, ता. अमळनेर) आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी यांचा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
दिनेश हा जळोद येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर काम करत होता तर मुलगी ही मजुरी करत होती. देवळी येथील आयटीआयच्या मागे असलेल्या निंबाच्या झाडावर त्यांचे मृतदेह आढळले. डीवायएसपी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हेकॉ. संतोष नागरे, उदय बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे शव खाली उतरवण्यात आले. त्यावेळी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू लावल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमसंबंध असावेत आणि त्यांनी ३० रोजी रात्रीच आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मुलीच्या मामाने फिर्याद दिली. त्यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


