पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील कोकणात भाजप व शिंदे सेनेमध्ये मोठा वाद सुरु होता. भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नीतेश व नीलेश या दोन्ही मुलांमध्ये भाऊबंदकीचा कथित वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या दोन्ही भावांना भाजपचा डाव ओळखून आपसातील वाद मिटवण्याचा सल्ला दिला आहे. राणे बंधूंनी भाजपचा खरा चेहरा ओळखून आपसातील वाद न वाढवता त्यावर पडदा टाकावा, असे ते म्हणालेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी मालवण येथील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर अनपेक्षित धाड टाकली होती. त्यात त्यांनी पैशाने भरलेली एक थैली चव्हाट्यावर आणली होती. या प्रकरणी त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांचे बंधू तथा भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे आपल्या बंधूंची पाठराखण केली होती. पण सोबतच त्यांना काही खोचक सल्लेही दिले होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या दोन्ही भावांना आपसातील वाद टाळण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवार म्हणाले की, राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळं राणे कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य वाटत नाही. भावकी-भावकीत वाद लागल्यानंतर काय होतं, वाद लावणाऱ्यांचा हेतू काय असतो? हे आम्ही अगदी जवळून बघितलंय.
राणे बंधूनी कुटुंबात, भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा ओळखून तसंच दुसऱ्याचं महत्व कमी करणं ही भाजपाची रणनीती समजून त्या जाळ्यात न अडकता आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकाला पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर धाड अर्थात स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बोलताना ते म्हणाले की, मला फक्त नोटीस आली नाही, तर माझ्यावर एफआयआरवर दाखल झाला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी मला अटक केली पाहिजे. पोलिस मला अटक का करत नाहीत? मी याच ठिकाणी बसून आहे. माझ्या बाजूलाच पोलिस ठाणे आहे. मी थांबलो आहे की, ते असे काही पाऊल उचलतील. कारण, माझ्यावर बेकायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. हे आता सर्वांना माहिती आहे आणि मी देखील ते पाहत आहे.
नीलेश राणे पुढे म्हणाले, मी चोराच्या घरातून चोरी पकडून दिली. पण पोलिसांनी समोरच्या व्यक्तीला साधी नोटीसही दिली नाही. उलट माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला असे वाटते की, देशात पहिल्यांदा असे घडले असेल की हे पाहा ही चोरीची बॅग आणि त्यातील चोरीचे पैसे, पण जो हे सर्व दाखवतो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आता मला ते म्हणतात की, मी विनापरवानगी घरात गेलो. तुम्ही अजूनही माझा व्हिडिओ पाहा. मी तिथे कुठेही तोडफोड केली नाही. हे सर्व लाईव्ह देखील होते. पण आता मला पाहायचे आहे की, पोलिस काय करतात?


