मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तरुण नेते युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘आत्याबाई’ म्हणून दिलेला जोरदार डान्स आणि खेळलेली फुगडी सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाली असून त्यांच्या या वेगळ्याच रुपाची प्रचंड चर्चा सुरू आहे.
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह ३० नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वांद्रे–कुर्ला संकुलातील जिओ सेंटरमध्ये संपन्न झाला. भव्य सजावट आणि मराठमोळ्या जल्लोषामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता पवार कुटुंबातील सर्वांनी हजेरी लावली. सुनेत्रा पवार यांनीही उपस्थिती दर्शवली.
युगेंद्र पवार यांची वरात पोहोचताच सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील महिलांनी ठेका धरत नाचाला सुरुवात केली. गंभीर, अभ्यासू आणि संयमी राजकारणी अशी ओळख असलेल्या सुळे यांचे हे उत्साही रूप पाहून उपस्थितांमध्येही जल्लोष उसळला. त्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला आणि इतरांनाही नाचण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या नृत्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून netizens कडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. मात्र पवार परिवारातील इतर सदस्यांच्या उपस्थितीमुळे आणि सुप्रिया सुळे यांच्या जल्लोषामुळे विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे.


