पुणे : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील चाकण परिसरात पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली. तळेगाव–चाकण रस्त्यावरील खराबवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या कंटेनरमध्ये तब्बल 40 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. काही क्षणातच कंटेनरला भडका उडाल्याने सर्व बाइक्स जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
NL-01AE-7346 क्रमांकाचा हा कंटेनर डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आला होता. चालकाने मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना अचानक कंटेनरमधून धूर येऊ लागल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकाने त्याला सांगितले. चालकाने लगेच मागील दरवाजा उघडताच आतून प्रचंड ज्वाळा बाहेर पडल्या. आग इतक्या वेगाने पसरली की कामगारांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला.
पेट्रोल पंपाजवळच आग लागल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. थोडाही विलंब झाला असता तर इंधन टँकपर्यंत आग पोहोचण्याचा धोका निर्माण झाला असता. मात्र पंप कर्मचाऱ्यांनी व चालकाने तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला कळवल्याने मोठा अनर्थ टळला. महाळुंगे MIDC पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. पहाटेचा वेळ असल्याने गावात शांतता होती, मात्र अचानक उठलेल्या ज्वाळा आणि धूर पाहून नागरिक घटनास्थळी धावले. पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरात गर्दी रोखली. कंटेनरमधील सर्व इलेक्ट्रिक बाइक्स नव्या होत्या आणि त्यांची विविध ठिकाणी डिलिव्हरी केली जाणार होती, अशी माहिती मिळते. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, संबंधित कंपनीचे अधिकारी आणि मालक घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


