जळगाव : प्रतिनिधी
शहरातील तीन सुवर्ण पेढ्यांमधून चार लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविणाऱ्या लकी शिवशक्ती शर्मा (३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) हिला शनिपेठ पोलिसांनी बरेली येथून अटक केली. इंटरनेटवर विविध व्हिडीओ बघून चोरीची पद्धत तिने पाहिली. तसेच चोरीसाठी ती गुगल मॅपचा वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जावून तेथे अंगठी बघताना हातचालाखी करीत आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून चार लाख ७० हजार रुपयांच्या अंगठ्या चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी जिल्हापेठ व शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी करताना एक महिला सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांकडून फुटेजच्या आधारावरुन तिचा शोध घेतला जात होता. जळगावात चोरी केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा फोटो राज्यभरात पाठविले होते. या दरम्यान चोरी करणारी महिला नागपुरातील सुवर्ण पेढीत पोहचताच त्या मालकांना महिलेवर संशय आल्याने त्यांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले व तिने चोरलेल्या अंगठ्या काढून दिल्यामुळे गुन्ह्याची नोंद झाली नाही. लकी शर्मा हिने यापूर्वी हरियाणातील कर्णाल, हिमाचलप्रदेश, छत्रपती संभाजी नगर आणि जळगावातील नामांकीत सुवर्णपेढ्यांमधून चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून तिची कसून चौकशी केली जात असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन ही महिला उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. तपासधिकारी पोहेकॉ प्रदीप नन्नवरे, वैशाली पावरा आणि पोकों नीलेश घुगे हे बरेली येथे पोहचले व लकी शर्मा हिला ताब्यात घेतले. शोरुममध्ये गेल्यानंतर दागिन्यांना लावलेले कोडचे टॅग चोरी करून ते बनावट अंगठ्यांना लावून सोन्याची अंगठ्या चोरुन नेल्याचे त्या महिलेने पोलिसांना सांगितले.


