नागपूर : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक परंपरेवर भाष्य करताना सांगितले की, “भांडणात पडणे हा भारताचा स्वभाव नाही. आपल्या परंपरेने नेहमीच बंधुत्व, सद्भाव आणि सामूहिक सलोखा यावर भर दिला आहे.”
ते नागपूरमधील नॅशनल बुक फेस्टिव्हलमध्ये बोलत होते. भागवत म्हणाले की, भारताची राष्ट्रवादाबद्दलची कल्पना पाश्चात्त्य व्याख्येपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. “आमचा कोणाशीही वाद नाही. आम्ही संघर्ष टाळतो. जगातील अनेक भाग संघर्षातून घडले, पण भारताचा आत्मा सह-अस्तित्वातून घडला,” असे त्यांनी सांगितले.
भागवत यांनी सांगितले की पाश्चात्त्य देशांना भारताच्या राष्ट्रत्वाची संकल्पना समजत नसल्याने त्यांनी याला ‘नेशनलिझम’ म्हणायला सुरुवात केली. “भारत हे प्राचीन काळापासून एक राष्ट्र आहे. वेगवेगळी राज्यव्यवस्था, परदेशी राजवटी आल्या-गेल्या, तरी लोकांमधील सांस्कृतिक एकता कधीच ढळली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, पाश्चात्त्य व्याख्येनुसार राष्ट्र म्हणजे केंद्रीकृत सरकार असलेले राष्ट्र-राज्य, परंतु भारताचे राष्ट्रत्व हे लोकांमधील परस्पर नात्यांवर, संस्कृतीवर आणि निसर्गासोबतच्या सह-अस्तित्वावर आधारित आहे.
ते पुढे म्हणाले, “धर्म, भाषा, परंपरा, आहार, राज्य या माणसाने घडवलेल्या भिन्नता आहेत. पण आपण सर्व भारतमातेची लेकरे आहोत, म्हणून एक आहोत.” कार्यक्रमात त्यांनी ज्ञानाच्या महत्त्वावरही भर दिला. “माहितीपेक्षा समज आवश्यक आहे. खरी समाधानाची भावना इतरांना मदत केल्याने मिळते. तात्पुरत्या यशाने नाही,” असे भागवत म्हणाले. या भाषणातून भागवत यांनी भारतीय संस्कृतीतील एकात्मता, परस्पर आदर आणि राष्ट्रभावनेची परंपरा अधोरेखित केली.


