मुंबई : वृत्तसंस्था
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या खटल्यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून अटक केली नाही, तोपर्यंत चार्जफ्रेमही होणार नाही, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
जरांगे म्हणाले की, “संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपीची आठवण धनंजय मुंडेंना भर सभेत कशी येते? याचा अर्थ आरोपी आणि मुंडे एकच आहेत. फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना सहआरोपी केले पाहिजे. मुंडेंना अटक केली तरच देशमुख यांना न्याय मिळेल; अन्यथा फडणवीस आरोपींना वाचवत आहेत, असा अर्थ होतो.”
धनंजय मुंडेंवर टीका करत त्यांनी म्हटले की, “अजित पवारांनी मुंडेंना स्टार पंप्चर केले आहे. इतक्या नीच प्रवृत्तीच्या माणसाला पद देता? परळीतील कोणती जात त्यांनी सोडली? सर्व समाजांना या टोळीने त्रास दिला आहे. परळीत अनेक जातींना त्यांनी ग्रासले आहे.”
पुढे ते म्हणाले, “अजित पवारांचा पक्ष चांगला आहे; पण हा नासका माणूस (मुंडे) सांभाळून ते पक्षाची प्रतिमा खराब करत आहेत. पक्षात ओबीसीचे इतर सक्षम नेते नाहीत का? दुसऱ्यांना संधी दिली तर पक्ष उंचीवर जाईल. हा नासका सांभाळण्याची गरज नाही—याला आम्हीच सरळ करतो.”
गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी न्याय मिळावा, यासाठी जरांगे यांनी पुन्हा सरकारला ठोस कारवाईची मागणी केली आहे.


