नाशिक : वृत्तसंस्था
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात तपोवनातील वृक्षतोडीवरून मोठा वाद चिघळला आहे. साधूग्राम प्रकल्पासाठी तब्बल 1800 झाडे तोडण्याची तयारी महापालिकेने सुरू केल्याची माहिती समोर आल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी शुक्रवारी (दि. 28) महत्वाचे स्पष्टीकरण देताना, “तपोवनातील एकही झाड तोडले जाणार नाही. फक्त गेल्या 5 ते 7 वर्षांत वाढलेली झुडपे हटवली जाणार आहेत. काही जण मुद्दाम दिशाभूल करत आहेत,” असे सांगितले.
दरम्यान, प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनाला भेट देत वृक्षतोड रोखण्यासाठी जोरदार भूमिका मांडली. ते म्हणाले,
“तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये. झाडं गेली तर नाशिकचे प्रचंड नुकसान होईल. जगात झाड हाच खरा सेलिब्रिटी—जो आपल्याला जगवतो तोच सेलिब्रिटी. झाडांवर फुल्या मारण्याची चेष्टा करू नका. झाडे तोडली तर कुणालाही माफ केले जाणार नाही.”
सयाजी शिंदेंच्या या विधानानंतर पर्यावरणप्रेमी अधिक आक्रमक झाले. त्यांनी स्पष्ट केले की, “झुडुपे 6–10 मीटरपर्यंत असतात. येथे तर झाडे गगनाला भिडली आहेत. आयुक्त ही झाडे झुडूप म्हणत असतील तर ते अनाकलनीय आहे,” असा त्यांचा संताप व्यक्त झाला. दरम्यान, सर्वेक्षणादरम्यान झाडांवर मारलेल्या पिवळ्या फुल्या आता काढून त्यावर हिरव्या डी-मार्किंग फुल्या मारण्याचे काम महापालिकेने सुरू केले असून नागरिकांत याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.


