हिंगणघाट : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट येथील सभेत ‘लाडकी बहिण’ योजनेवर महत्त्वपूर्ण विधान केले. “जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन देत त्यांनी या योजनेबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवरही पडदा टाकला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “काही जणांनी अफवा पसरवल्या की योजना बंद होणार. पण ही योजना बंद होणे तर दूरच, आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीला ‘लखपती दीदी’ बनवणार आहोत.” त्यांच्या या वक्तव्याने सभेला उपस्थित महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सभेला राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, विजय आगलावे, भूपेंद्र शहाणे तसेच भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर आणि सिंदी (रेल्वे) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राणी कलोडे यांच्या उपस्थितीमुळे वातावरण उत्साही झाले.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंगणघाट आणि परिसरासाठी राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहितीही दिली. ते म्हणाले—
“प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे काम आपण पूर्ण केले असून वाढीव पाणीपुरवठा योजना येत आहे.” “शहरांमध्ये भुयारी गटार योजनांचे काम जलदगतीने सुरू आहे.” “हिंगणघाटमध्ये ४०० बेडचे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होईल.” “महा फुले जनआरोग्य योजनेत नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत.” नदीलगत ब्लू लाईनमध्ये अडचणीत आलेल्या घरांबाबतही त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. “यासाठी समिती तयार करून घरांची तपासणी केली जाईल. विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.


