अमळनेर : प्रतिनिधी
शेडनेट मंजुरीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या नावावर सात लाखांचे कर्ज घेऊन त्याची आर्थिक फसवणूक करण्यात आली. २०२० मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पंडित शेलार व त्याचा सहकारी उद्धव कुवर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पारोळा तालुक्यातील नेरपाट येथील शेतकरी मधुकर गरबड पाटील यांची अमळनेर तालुक्यातील सडावण येथे शेती आहे. वर्ष २०२० मध्ये त्यांनी पोखरा योजनेत अमळनेर तालुका कृषी विभागात अर्ज केला होता. त्याचवेळी त्यांना एजंट समाधान शेलार हा भेटला आणि त्याने शेडनेट आणि त्यासोबत कर्जही मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर ते युनियन बँकेत गेले, जिथे काही कागदपत्रांवर मधुकर पाटील यांचे अंगठे घेतले गेले.
सोनेवाडी (ता. शिंदखेडा) येथील कंपनी कामगारांनी त्यांच्या शेतात शेडनेटसाठी खांब उभारले. मात्र, प्रत्यक्षात शेडनेट बसवण्यात आले नाही. काही काळानंतर युनियन बँकेकडून नोटीस येताच मधुकर पाटील यांना समजले की, त्यांच्या शेतजमिनीवर बोजा ठेवण्यात आला असून सात लाख रुपयांचे कर्ज घेतले गेले आहे. व्याजासह ही रक्कम सुमारे अकरा लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या खात्यातील कर्ज रक्कम १८ फेब्रुवारी २०२० रोजी ओम अॅग्रो सर्व्हिसेस, सोनेवाडी यांच्या खात्यावर वळती करण्यात आलेली आहे. याप्रकरणी पाच वर्षांनंतर अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. वरील दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे


