मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या धमकीवजा वक्तव्याने नवे वादळ उठवले आहे. “मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापून काढू,” असे शब्द देशमुख यांनी सार्वजनिक व्यासपीठावर उच्चारले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत देशमुखांच्या भाषेचा तीव्र निषेध केला. “ही भाषा नक्षलवाद्यांची नव्हे, तर सत्ताधारी भाजप आमदारांची आहे. विरोधकांना कापून टाकण्याची मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी टीका त्यांनी केली.
रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थेट सवाल उपस्थित केला. “सार्वजनिक व्यासपीठावर सज्जनतेचे धडे देणारे मुख्यमंत्री आपल्या आमदारांना विरोधकांचे ‘एन्काऊंटर’ करण्याची परवानगी देतात का? या विधानावर मुख्यमंत्री तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा देशमुख यांच्या विधानाला त्यांचा पाठींबा असल्याचेच मानले जाईल,” असे ते म्हणाले.
सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात “हे फडणवीस साहेबांचे सरकार आहे… कुणी घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे,” असेही म्हणत विरोधी पक्षांना ‘कापून टाकण्याचा’ इशारा दिला होता. राज्यातील निवडणूक राजकारणात या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.


