मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दीड महिन्यापासून माध्यमांपासून दूर असलेले प्रकृतीच्या कारणांमुळे शिवसेनेचे खासदार आणि पक्षाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत पुढील आठवड्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत. येत्या सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढारी न्यूजचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी दिली.
संजय राऊत हे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे महत्त्वाचे चेहरे असून, २०१९ मधील महाविकास आघाडी सरकारपासून त्यांनी दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून ते आरोग्य कारणास्तव या दिनचर्येपासून दूर होते. त्यांच्या उपचारांचा कालावधी आता संपत आल्याची माहिती मिळत आहे.
राऊत यांनी या काळात माध्यमांशी प्रत्यक्ष संवाद साधला नसला तरी ‘सामना’च्या माध्यमातून ते सातत्याने पक्षाची भूमिका मांडत होते. बिहार निवडणुका असोत किंवा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा—या दोन्ही काळात राऊत यांच्या प्रतिक्रियांना महत्त्व असते. त्यामुळे सोमवारी ते कोणती नवी राजकीय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सध्या शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांना वेग आला आहे. या चर्चांमध्ये संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. राऊत हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते असूनही त्यांचे राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते. सोमवारी होणाऱ्या संवादातून राऊत कोणती दिशा देतात, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहतील, असे मानले जात आहे.


