सोलापूर : वृत्तसंस्था
कुर्डूवाडी येथील नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन्ही पक्ष एकत्र लढत असून, या एकीमुळे भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांची सुरूवात होऊ शकते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी केले. गांधी चौकातील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व दोन्ही पक्षांचे उमेदवार उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नंतर जिल्ह्यात मोठे नेतृत्व निर्माण झालेले नाही. काही जण जिल्ह्यातील नेतृत्वालाही घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. कुर्डूवाडीच्या विकासाच्या प्रश्नांना आपण नेहमीच प्राधान्य दिले असून, शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सभा दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, कुर्डूवाडी शहरासाठी उजनी धरणातून पाणीपुरवठा योजना राबवली जाईल. शहरातील रेल्वेच्या भरावाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. दोन ओढ्यांवर उंच पूल, शहरात बगीचा, ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि स्पर्धा परीक्षांसाठी लायब्ररी अशी विकासकामे अकलूज पॅटर्ननुसार केली जातील.
या युतीला ‘कुर्डूवाडी पॅटर्न’ असे संबोधत शिवसेना संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी सांगितले की, उद्योग मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, परिवहन मंत्री आणि नगरविकास खात्यांमुळे शहराच्या विकासाला मोठा वेग मिळणार आहे. एसटी स्टँडचे आधुनिकीकरण करून व्यापारी गाळे उपलब्ध करण्याचीही घोषणा करण्यात आली.


