जळगाव : प्रतिनिधी
सावखेडा शिवारातील वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम, गुरुकुल किड्ससह चार शाळांना टार्गेट करत चोरट्यांनी तब्बल १ लाख ९४ हजारांची रोकड लांबवली. २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही चोरी घडली असून तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली असून फुटेजमध्ये तरुण मुलींचा सहभाग दिसून आल्याने पोलिसांसमोर नवे धागेदोरे मिळाले आहेत.
फिर्यादी आशिष चंद्रकांत अजमेरा (५३, रा. हरेश्वर नगर), मुख्याध्यापक — वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल — यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या फी आणि शिष्यवृत्ती परीक्षेची एकूण १ लाख ३५ हजारांची रक्कम चोरीस गेली आहे. शहरापासून दूर आणि पूर्णपणे शेतशिवारात असलेल्या या शाळांना रात्रीच्या वेळी वर्दळ नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. याच भागात गेल्या महिन्यात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ११ लाखांची रोकड चोरीला गेल्याची आठवण ताजी आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.२५ वाजता अजमेरा शाळेत पोहोचताच मुख्य गेट आणि दुसऱ्या ग्रिल गेटचे कुलूप तुटलेले दिसून आले. चौकशीअंती अॅडमिन रूममधील कपाट आणि स्टील पेटीचे कुलूप उचकटून संपूर्ण रोख रक्कम लांबवल्याचे स्पष्ट झाले.
या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून वर्धमान शाळेच्या कॅमेऱ्यात स्कार्फ बांधलेल्या काही युवती परिसरात संशयास्पद हालचाल करताना दिसतात. गुरुकुल किड्स शाळेच्या फुटेजमध्येही मास्क-स्कार्फ घातलेल्या युवती आणि एक युवक दिसून आला आहे. त्यामुळे या चोरीत युवक–युवतींच्या टोळीचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकारामुळे शाळा परिसरातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


