मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची धामधूम वाढत असताना राजकीय पटलावर मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथील निवासस्थानी आज सकाळी सुमारे ११.३० वाजता अनपेक्षित भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे कोणतीही टीम किंवा पक्षातील प्रमुख नेते न घेता एकटेच पोहोचले. त्यामुळे या भेटीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.
राजकीय वर्तुळात मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, राज्यातील बदलते राजकीय वातावरण आणि संभाव्य राजकीय युती यांना केंद्रस्थानी ठेवून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात पुन्हा नवे समीकरण उभे राहू शकते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असताना, नवीन राजकीय शक्तीकरणाची आवश्यकता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेची महाविकास आघाडीत शक्य तितकी सामील करणे किंवा किमान निवडणुकांमध्ये धोरणात्मक सहकार्य साधणे, हा पर्याय चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मनसेला आघाडीत सहभागी करण्याच्या कल्पनेबाबत सकारात्मक संकेत दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचा विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला असून, ठाकरे बंधूंच्या भेटीने त्या चर्चांना नवे बळ मिळाले आहे.
एकेकाळी शिवसेनेच्या मंचावरून एकत्र मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणारे उद्धव व राज ठाकरे मागील दशकभर वेगवेगळ्या राजकीय मार्गाने पुढे गेले. मात्र, आजच्या अनिर्धारित भेटीने दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी ठरली आहे.
ही भेट नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली आणि कोणते निर्णय चर्चेत आले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रिकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.


