बीड : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घटना घडत असताना आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री उशिराच्या सुमारास मांदगावजवळ नगर-सोलापूर महामार्गावर दहा ते पंधरा जणांच्या मुखवटा बांधलेल्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून जोरदार हल्ला केला. दगडफेक, गाडीची तोडफोड आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करत हल्लेखोरांनी राम खाडे यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यासोबत असलेले सहकारीही मारहाणीमुळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर या घटनेत राजकीय कटकारस्थान असल्याची शंका अधिक तीव्र झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम खाडे आपल्या सहकाऱ्यांसह मांदळी गावातील एका हॉटेलमधून जेवण करून बीडकडे परतत होते. अचानक अंधारात हल्लेखोरांनी गाडीच्या समोर अडथळा आणला आणि जोरदार दगडफेक सुरू केली. साईड मिरर फोडत वाहनाची मोठी हानी केली. त्यानंतर लाठ्या, तलवारी, पिस्तूल आणि सत्तूर घेऊन हल्लेखोरांनी थेट गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाडे यांनी काही वार हातावर झेलले, परंतु हल्ला अत्यंत आक्रमक असल्याने त्यांच्या हाताला खोल जखमा झाल्या. परिस्थिती इतकी गंभीर होती की रुग्णालयात दाखल होईपर्यंत त्यांची शुद्ध गेली होती आणि शरीर रक्तबंबाळ झाले होते.
हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक होत गेल्याने तातडीने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. रुग्णालय प्रशासनानेही त्यांच्या प्रकृतीवर गंभीर असल्याचे म्हटले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळावरून एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, खाडे यांच्या जखमी सहकारी दीपक खिळे यांनी या हल्ल्यामागे थेट राजकीय द्वेष असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, राम खाडे अनेक भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणण्यात आघाडीवर होते. त्यांनी विविध स्तरांवर तक्रारी केल्याने काही व्यक्तींना मोठा फटका बसणार होता. त्यामुळेच बदला घेण्यासाठी नियोजनपूर्वक हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात आवाज उठवल्याची शिक्षा आम्हाला देण्यात आली, असेही त्यांनी म्हटले आहे. हल्लेखोरांबरोबरच हल्ल्याचे सूत्रधार कोण आहेत? याचा तपास करुन तातडीने अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


