नांदेड : प्रतिनिधी
वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील सभेत भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्यावर थेट आणि तीव्र शब्दांत निशाणा साधला. चव्हाण यांच्या कुटुंबाकडे असलेल्या विविध एजन्सी आणि आर्थिक सामर्थ्याचा संदर्भ देत शिरसाट यांनी विचारले “अशोकराव भाकरी खातात का नोटा?”
नांदेड जिल्ह्यातील १३ नगर परिषदांच्या निवडणुकीचे रणांगण तापले असून, भोकर आणि मुदखेड या दोन नगरपालिकांत खा. चव्हाण यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात खा. अशोक चव्हाण आणि खासदार चिखलीकर यांच्यातील वाकयुद्धाला आता बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या हल्ल्यांनी अधिक धार आली आहे.
भोकर नगर परिषदेसाठी शिवसेनेने सुभाष किन्हाळकर यांना नगराध्यक्षपदासाठी उभे केले असून, या पार्श्वभूमीवर मंत्री शिरसाट यांनी सोमवारी घेतलेल्या सभेत जोरदार टीकास्त्र सोडले. प्रवासादरम्यान आ. हेमंत पाटील यांच्याकडून खा. चव्हाण यांच्या व्यवसायाविषयी माहिती मिळाल्याचे सांगत शिरसाट म्हणाले,
“ही एजन्सी त्यांच्याकडे, ती एजन्सी त्यांच्याकडे… इतका पैसा कशाला? मग प्रश्न पडतोच अशोकराव भाकरी खातात की नोटा?”
ते पुढे म्हणाले, “सर्वजण भाकरीच खातात. कोणाला एक लागते, कोणाला जास्त लागते. मग अशोकरावांना एवढा पैसा कशाला हवा? आम्ही प्रामाणिक आहोत; आमच्याकडे हरामाचा पैसा नाही.” यावेळी त्यांनी भोकर शहरातील विकासकामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जेथे लेआऊट पाडले आहेत त्या भागांत रस्ते झाले; पण जेथे खरोखर लोक राहतात तेथे रस्ते नाहीत. हे कसले प्रशासन?” असा सवाल त्यांनी विचारला. सभेला आ. हेमंत पाटील, प्रल्हाद इंगोले, बाळासाहेब देशमुख तरोडेकर, प्रमोद देशमुख, शिवाजी किन्हाळकर, माधव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेचे उमेदवार सुभाष किन्हाळकर म्हणाले, “भोकर नगर परिषद भ्रष्टाचारमुक्त करण्याची संधी द्या.” दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजकीय प्रवासावरूनही शिरसाटांनी टीका केली. काँग्रेसमध्ये असताना, २०१७ च्या मनपा निवडणुकीत तेव्हाचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीच त्यांना ‘लीडर नव्हे, डीलर’ म्हटले होते, याची आठवण करून देत त्यांनी चव्हाणांवर पुन्हा हल्ला चढवला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या तुफानी टीकास्त्रांमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


