एरंडोल : प्रतिनिधी
आडगावकडून भरधाव येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत येथील कापसासह फळांचा व्यापार करणाऱ्या प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की , आडगाव येथील तरुण दुचाकी (एमएच- १५, केइ २९४९) ने भरधाव वेगाने आडगावकडून येत असताना त्याच्या दुचाकीने येथील अशोक भिका भोई (वय ५५) यांना जबर धडक दिली. एरंडोल ते कासोदा रस्त्यावर साई हॉस्पिटल समोर ही घटना घडली. या घटनेनंतर अशोक भोई यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथे दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. याबाबत उशिरापर्यंत कासोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. मयत अशोक भोई हे कापसासह फळांचा व्यापार करत होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ते कासोदा येथील कापासाचे व्यापारी व स्थानिक भोई समाजाचे अध्यक्ष हिंमत भिका भोई यांचे ते लहान बंधू होत. दरम्यान, सध्या गावात अशा प्रकारे भरधाव दुचाकी चालवणाऱ्या युवकांचे प्रमाण वाढले आहे. या युवकांना कुणी आळा घालेल का? असा प्रश्न यानिमित्त ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.


