जळगाव : प्रतिनिधी
एकाच रात्री सहा दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर तेथून सहा लाखांची रोकड चोरुन नेली होती. ही धाडसी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी वेशांतर केले आणि ते रिक्षाने बस स्थानकावर गेले. तेथून बसने शिरपूर पर्यंत आणि त्यानंतर खासगी वाहनाने ते मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका गावात गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यानुसार पोलिसांकडून या चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजारा शेजारी असलेल्या मार्केटमधील सहा दुकानांमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास दुकानांचे शटर उचकवून चोरट्यांनी सहा लाख रुपयांची रोकड व चांदीचे शिक्के चोरून नेले होते. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये चार चोरटे हे चोरी केल्यानंतर पायी कालिंका मंदिरापर्यंत पायी गेले. त्यातील दोघांनी रिक्षा थांबवून त्यातून ते अजिंठा चौफुली पर्यंत गेले, तर उर्वरीत दोघे दुसऱ्या रिक्षाने नवीन बसस्थानकापर्यंत गेले. त्यानंतर ते सर्वजण एकाच बसने प्रवास केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर चोरट्यांनी कपडे बदलवून वेशांतरण केले. परंतू चोरट्यांकडे असलेल्या बॅगवरून ते चोरटे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. नवीन बसस्थानकातून एकाच बसने प्रवास करीत चोरटे शिरपूर पर्यंत गेले. ज्या बसमधून त्यांनी प्रवास केला त्या बसच्या वाहकाचा शोध घेवून त्यांनी अधिक माहिती जाणून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. बसने शिरपूरपर्यंत प्रवास केल्यानंतर सर्वजण तेथे उतरले. तेथून त्यांनी एका खासगी वाहनातून मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका गावापर्यंत गेले. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित काढलेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस त्यांच्या गावापर्यंत पोहचले. मात्र चोरटे त्या गावात मिळून न आल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे


