नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिजोरीच्या चाव्यावरून राजकारण तापले असताना आता यासंदर्भात सुरुवातीला एका जाहीर सभेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होती. अशातच आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेतून अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिकमधील सभेत संबोधित करताना शिवसेनेचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. अजित पवारांनी मला विचारले विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी भगूरला जाऊ का? मी सांगितले जा आणि पाणीपुरवठा योजनेचे घोषणा केली. शहण्यासारखे वागावे, दुसऱ्याचे पोर आपले सांगू नये, असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना लगावला. तसेच यावेळी बोलताना पाटील यांनी शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुकही केले.
आता पाणी योजना आम्ही आणली त्यांनी सांगितले आमची आहे. आता तर नगरविकास खाते आपल्याकडे आहे नगरविकास खाते मे माल है, असे विधान गुलाबाराव पाटील यांनी केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा झडू लागल्या आहेत. मी मतदारसंघात बौद्ध विहार कामे केली सर्व समाजासाठी कामे केली. एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात 350 कोटी रुपये दिले, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे कोंबडी विकायचे, बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, छगन भुजबळ हे भाजी विकायचे आणि बुलढाण्याचे विजयराज शिंदे हे पुंगाणी वाजवणारे गुरव होते, अशी उदाहरणे दिली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सामान्य लोकांना मोठे केले हे गुलाबराव पाटील यांनी यातून अधोरिखेत केले. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.


