जळगाव : प्रतिनिधी
पती कामावर तर पत्नी मंदिरात गेलेली असताना अवघ्या अर्धा तास बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी ६७ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी तिवारी नगरमध्ये घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, खासगी नोकरीला असलेले विलास दत्तात्रय सैतवाल (५६, रा. तिवारी नगर) हे २४ रोजी सकाळी कामावर निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नी नीलिमा या सकाळी ११ वाजता घराला कुलूप लावून मंदिरात गेल्या. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ६० हजार रुपये किमतीची सोनपोत, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, दोन हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ११:३० वाजता नीलिमा या मंदिरातून घरी परतल्या त्या वेळी चोरीची ही घटना लक्षात आली. गुन्ह्याचा तपास पोहेकों जितेंद्र राठोड करीत आहेत.


