मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर मोठे विधान केले आहे. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र, आज झालेल्या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.
माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय रणांगणात उतरणार, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या लढाऊ वृत्तीवर मोहोर मारली. ठाकरे यांच्या या विधानामुळे शिवसेना-ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील राजकारणात नेहमीच ठाम भूमिका घेणारे आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या गंभीर समस्यांमुळे घराबाहेर निघू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीत त्यांना गंभीर प्रकारचा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगिले आहेत. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली. या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
उद्धव ठाकरे दुपारी भांडूपमधील मैत्री नावाच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा राऊत यांचे बंधू, आमदार सुनील राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. संजय राऊत यांना थेट भेटून त्यांच्याशी काही काळ चर्चा केली. गेल्या काही आठवड्यांपासून प्रकृती ढासळल्यामुळे राऊत यांनी संपूर्ण राजकीय कामकाज थांबवले होते. त्यांनी सोशल मीडियावरून स्वतःच माहिती देत सांगितले होते की, अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना गर्दीपासून आणि ताणतणावापासून दूर राहणे आवश्यक आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट राऊत कुटुंबासाठी धीर देणारी ठरली.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या लवकर बरे होण्याबद्दल पूर्ण खात्री व्यक्त केली. ते म्हणाले, अनेक दिवसांपासून त्यांना भेटण्याचं मनात होतं. आज भेट झाली आणि खूप समाधान वाटलं. संजय आता आधीपेक्षा बरे दिसत आहेत. ते लवकरच राजकीय मैदानात परत येतील आणि नेहमीप्रमाणे आपल्या शब्दांनी आणि भूमिकेने वातावरण तापवताना दिसतील. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर पसरल्याचे दिसून आले.
जरी डॉक्टरांनी संजय राऊत यांना बाहेर न पडण्याचे आदेश दिले असले, तरी 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी डॉक्टरांचा सल्ला बाजूला ठेवत शिवाजी पार्कवर जाऊन अभिवादन केले होते. मास्क लावून आणि सुनील राऊत यांच्या आधाराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यामुळे संकटात असतानाही त्यांचा शिवसैनिक जागा असल्याचे कार्यकर्त्यांना पुन्हा जाणवले.


