ठाणे : वृत्तसंस्था
शहरातील पोखरण रोड क्रमांक 2 परिसरातील मामुली वादाने दोन दिवसांतच मोठे रूप धारण करत शहरात तणावाची परिस्थिती निर्माण केली. गांधीनगर येथील अनिल वाईन्ससमोर रिक्षा लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादादरम्यान उत्तर प्रदेशातील रिक्षाचालक शैलेंद्र संतोष यादव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर येताच मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात तणाव वाढला.
मनसेकडून पोलिसांकडे तातडीने तक्रार करण्यात आली. पोलिसांनीही तत्परता दाखवत शैलेंद्र यादवला ताब्यात घेतले. मात्र पोलिस ठाण्यातच मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची माहिती पुढे आली. स्वतः अविनाश जाधव यांनीही हा प्रकार मान्य करत, “राज ठाकरे यांच्याविरुद्ध बोलल्यास कुणालाही सोडले जाणार नाही” असा इशारा दिला. त्यामुळे वातावरण आणखी तापले.
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले. पोलिस ठाण्यात शैलेंद्र यादवने हात जोडून माफी मागितली. त्याने कान धरून उठाबशा काढत आपल्या कृत्याबाबत खेद व्यक्त करत सांगितले की, तो दारूच्या नशेत होता आणि नशेमुळे त्याच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडले. “मी साधा रिक्षाचालक आहे, घर चालवण्यासाठी मेहनत करतो. अशी चूक पुन्हा होणार नाही,” असेही तो म्हणाला. त्याच्या या भूमिकेमुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात कमी झाला.
पोलिसांनी स्पष्ट केले की, सुरुवातीला रिक्षा लावण्यावरून मराठी युवक आणि यादवमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर यादवने चिडून मनसे नेतृत्वावर शिवीगाळ केली आणि काही परप्रांतीय तरुणांनी त्याला पाठिंबा दिल्याने परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. व्हिडिओ व्हायरल होताच प्रकरण चिघळले. पुढील काळात अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणामुळे ठाण्यात पुन्हा एकदा मराठी–परप्रांतीय वादाचे सावट दिसले. तथापि, पोलिसांच्या वेगवान हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. आरोपीची माफी आणि मनसेचा इशारा – या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर शहरात सावधगिरीचा इशारा देत पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.


