चोपडा : प्रतिनिधी
चोपडा ते शिरपूर जुन्या रस्त्यावर दुचाकी आणि बसच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ५:४५ वाजता घडली. यात, अन्य एक विद्यार्थी जखमी झाला आहे. जय प्रदीप महाजन (वय १५, रा. अकुलखेडा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
अकुलखेडा (ता. चोपडा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जय प्रदीप महाजन आणि त्याचा मित्र नील हर्षल पाटील हे चोपडा येथे शिकवणीसाठी येत असताना ही घटना घडली. जय आणि नील हे दुचाकीने (क्रमांक एमएच १९ बीएल ०६०७) चोपड्याकडे येत होते. त्याचवेळी चोपड्याकडून गणपरला जाणारी बस क्रमांक एमएच २० बीएल २०८३) आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. या अपघातात जय प्रदीप महाजन हा जागीच ठार झाला. तर नील जबर जखमी झाला. त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांनी दिली.
बस ही विरुद्ध दिशेला गेल्याने हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. मृत जय याच्यावर दुपारी तीन वाजता अकुलखेडा (ता. चोपडा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर नेहरू विद्यालयात कामकाज बंद ठेवण्यात आले होते. बसचालक राजमल बोरसे यांना आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी पोलिस ठाण्यात दाखल होण्याच्या सचना दिल्या.


