अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शिरूड गावातील २४ वर्षीय तरुणाचा आंघोळ करताना अकस्मात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयूर नरेंद्र पाटील (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर सकाळी अंदाजे १० वाजता आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता तो आतमधे कोसळलेल्या अवस्थेत आढळला. तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरूड ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र राजाराम पाटील यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अभ्यासू, नम्र व मनमिळाऊ स्वभावामुळे गावात त्याची चांगली ओळख होती. अवघ्या २४ वर्षांच्या मयूरच्या अचानक मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. पश्चात आई-वडील व बहिण असा परिवार आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.


