मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी, राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे, घड्याळाच्या पाठीशी उभं राहिलात तर बारामती सारखा विकास तुमच्याकडे करील, असे विधान केले होते. या विधानाने विरोधकांनी सरकारवर थेट पक्ष निष्ठेच्या आधारे विकासाचे आश्वासन देत असल्याचा आरोप केला आहे. अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा संपूर्ण राज्यात होत असतानाच, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वक्तव्यावर कडक शब्दांत टीका केली.
नाना पटोले म्हणाले की, राज्याची तिजोरी एखाद्या व्यक्तीची संपत्ती नसून संपूर्ण जनतेचा निधी आहे. संविधानाने कोणत्याही मंत्र्याला तिजोरी लुटण्याचा किंवा तिजोरीचा वापर पक्षीय स्वार्थासाठी करण्याचा अधिकार दिलेला नाही. विकासाच्या नावाने मतं मागण्याऐवजी सत्ता आणि पैशांची भाषा करणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याचे पटोले म्हणाले. ते पुढे म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतःच्या अधिकारांची मिरवणूक करत फिरतात आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्ष आपली ताकद दाखवत जनतेसमोर गर्विष्ठपणे बोलतो. महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकले आहेत का? अशीच भाषा या लोकांकडून ऐकायला येते, असा कडवा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, लोकांनी निवडून दिल्याचा अर्थ नेता मालक झाला असा होत नाही. सत्तेत बसलेले लोक हे पाच वर्षांसाठी जनतेचे सेवक आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. पटोले यांचा आरोप असा की, सत्तेचा माज आणि गर्व इतका वाढला आहे की सत्ताधारी जनता सर्व सहन करेल, हे त्यांना गृहित धरलं आहे. जनता तुम्हाला सत्तेत बसवते, तशीच ती तुम्हाला खालीही खेचू शकते. मालकाची भाषा आणि धमकीची भाषा लोकशाहीत चालत नाही. जनता हा गर्व चूर करून टाकेल, असा थेट इशारा पटोले यांनी अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांना दिला.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. बावनकुळे यांनी, मी भाजपचा स्टार प्रचारक आहे, कितीही खर्च होऊ द्या, निवडणूक आयोगाला उत्तर देऊ, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने भाजपच्या नेत्यांना सत्ता आणि पैशांचा माज चढल्याचे पटोले यांनी म्हटले. त्यांच्या मते, सत्तेच्या जोरावर पैसा जमा करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी धोकादायक आहे. भाजपला सत्ता मिळाल्यावर एक प्रकारची सर्वशक्तिमानता वाटायला लागली आहे. मात्र नगरपालिका निवडणुकीत जनता त्यांचा हा माज उतरवेल, असा दावा पटोले यांनी केला.


