मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई शहरातील घाटकोपर परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्रोळी पार्कसाईटमध्ये राहणारे आणि परिसरात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर यांना गुरुवारी सीजीएस कॉलनीत निर्घृणपणे ठार मारण्यात आले. केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून सुरुवात झालेल्या वादाचे रुपांतर काही क्षणांतच भांडणात झाले आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात संताप व हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, पाचाडकर हे नियमितपणे घाटकोपर स्टेशन परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असत आणि त्या वेळीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.
या घटनेत आरोपी अमन श्रीराम वर्मा (वय 19) याला घाटकोपर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाचाडकर सीजीएस कॉलनीत पायी चालत असताना आरोपी अमन याचा त्यांना धक्का लागला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद तीव्र होताच त्याचे रूप झटापटीत बदलले. अचानक अमनने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि तो थेट पाचाडकर यांच्या डोक्यात घातला. जबर मार बसल्याने पाचाडकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हत्येनंतर अमन वर्मा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे व त्यांच्या पथकाने मोठे अभियान राबवले. जवळपास 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज हाती घेऊन त्याचा पाठलाग करण्यात आला. अनेक ठिकाणचे व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांना अमनच्या हालचालींचा माग मिळाला. शेवटी रमाबाई कॉलनी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. पुढे या प्रकरणात कोणती कारवाई होते, याकडे आता स्थानिकांचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुरेंद्र पाचाडकर यांच्या मृत्यूने विक्रोळी पार्कसाईट परिसरात शोककळा पसरली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेशी निष्ठा असलेले आणि शाखेतील कामात सदैव सक्रीय असलेले पाचाडकर हे कार्यकर्त्यांमध्ये आदराने ओळखले जात. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा पुढाकार असे. शिवजयंतीच्या कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत ते चित्ररथावर उभे राहत असत, त्यामुळे त्यांना महाराज म्हणूनही ओळखले जाई. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांसह रहिवासीही हळहळ व्यक्त करत आहेत.


