जळगाव : प्रतिनिधी
मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संतोष माणिक चौधरी (६७, रा. निमखेडी शिवार) यांची १२ लाख ५० हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २१ फेब्रुवारी २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी २० नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, संतोष चौधरी यांचा मुलगा जगदीश चौधरी याला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे संदीप वसंत भोळे, दीपाली संदीप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव) व त्यांचे साथीदार धीरज पांडुरंग मुंगलमारे (रा. सिंदूरवाफा, जि. भंडारा), अण्णा नामदेवराव गोहत्रे (रा. नागपूर) यांनी सांगितले. त्यासाठी चौघांनी फिर्यादीकडून रोख व ऑनलाइन पद्धतीने एकूण १५ लाख रुपये स्वीकारले. याप्रकरणी संतोष चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पैसे घेतल्यानंतर जगदीश यांना रेल्वेच्या नोकरीचा बनावट नियुक्ती आदेश दिला. मात्र, प्रत्यक्षात नोकरी काही लागली नाही. नोकरी न मिळाल्याने तक्रारदाराने पैसे परत मिळावे, अशी मागणी केली. त्यावेळी केवळ २ लाख ५० हजार रुपये परत दिले. वारंवार मागणी करूनही उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये परत न करता फसवणूक केली


